शाडूच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करणा-या नागरिकांचा ‘पर्यावरणमित्र’ प्रशस्तिपत्राने सन्मान
दीड व पाचव्या दिवशी व्यवस्थित रितीने पार पडलेल्या विसर्जन सोहळ्याप्रमाणेच गौरींसह होणारा श्रीगणेशमूर्ती विसर्जन सोहळाही अत्यंत भावपूर्ण वातावरणात २२ नैसर्गिक आणि १५६ कृत्रिम विसर्जन तलावांवर नवी मुंबई महानगरपालिकेने केलेल्या सुनियोजित व्यवस्थेमध्ये निर्विघ्नपणे संपन्न झाला. या विसर्जन सोहळयात १४३१८ श्रीगणेशमूर्तींचे व २२३० गौरींचे भक्तीपूर्ण विसर्जन करण्यात आले. सर्वच ठिकाणी महानगरपालिकेने केलेल्या चोख व्यवस्थेमुळे तसेच सुसज्ज पोलीस यंत्रणेमुळे सर्व ठिकाणचे विसर्जन सुव्यवस्थित रितीने पार पडले.
महापौर श्रीम. सुजाता पाटील आणि महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी ‘पर्यावरणपूरक प्लास्टिकमुक्त श्रीगणेशोत्सव’ साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्याला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. २५९८ शाडूच्या श्रीमूर्तींचे विसर्जन करुन नागरिकांनी पर्यावरणाविषयी जागरुकता दाखविली. शाडूच्या मूर्ती प्रतिष्ठापना करणाऱ्या विसर्जनासाठी आलेल्या नागरिकांना महापौर व इतर पदाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांच्या स्वाक्षरीचे स्वच्छता व पर्यावरणमित्र प्रशस्तिपत्र प्रदान करुन सन्मानित करण्यात आले. प्रशस्तिपत्राच्या माध्यमातून नागरिकांचे पर्यावरण जपणूकीबद्दल कौतुक करुन इतरही नागरिकांना त्यादृष्टीने प्रोत्साहित करण्याच्या संकल्पनेचे नागरिकांनी स्वागत केले. मा.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ६ फूटापेक्षा कमी उंचीच्या श्रीमुर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावातच करावे या आवाहनाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद लाभला.
नमुंमपा क्षेत्रातील २२ नैसर्गिक विसर्जन स्थळे व ११ (१४ गावांतील) नैसर्गिक विसर्जन स्थळे तसेच १५६ कृत्रिम विसर्जन स्थळे अशा एकूण १८९ विसर्जन स्थानांवर एकूण १४३१८ श्रीगणेशमूर्तींचे व २२३० गौरींचे विसर्जन सुरळीतपणे पार पडले.
यामध्ये बेलापूर विभागात ५ नैसर्गिक व २१ कृत्रिम विसर्जन स्थळांवर १५५६ घरगुती व १४ सार्वजनिक श्रीगणेशमूर्तीचे आणि १९८ गौरींचे विसर्जन करण्यात आले.
नेरुळ विभागात २ नैसर्गिक व २४ कृत्रिम विसर्जन स्थळांवर ११३१ घरगुती श्रीगणेशमूर्तीचे व २२६ गौरीचे विसर्जन संपन्न झाले.
वाशी विभागात २ नैसर्गिक आणि १६ कृत्रिम विसर्जन स्थळांवर ९३७ घरगुती व ०९ सार्वजनिक श्रीगणेशमूर्तींचे तसेच ११९ गौरींचे विसर्जन करण्यात आले.
तुर्भे विभागात ३ नैसर्गिक व २१ कृत्रिम विसर्जन स्थळांवर १००६ घरगुती व २२ सार्वजनिक श्रीगणेशमूर्तींचे तसेच १४८ गौरींचे विसर्जन झाले.
कोपरखैरणे विभागात २ नैसर्गिक व १६ कृत्रिम विसर्जन स्थळांवर २८३४ घरगुती श्री गणेश मूर्तींचे व ८३८ गौरींचे विसर्जन संपन्न झाले.
घणसोली विभागात ४ नैसर्गिक व १५ कृत्रिम विसर्जन स्थळांवर ४३३१ घरगुती श्रीगणेशमूर्तींचे व ४३० गौरींचे विसर्जन करण्यात आले.
ऐरोली विभागात ३ नैसर्गिक व १८ कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये १४१५ घरगुती व ४४ सार्वजनिक श्रीगणेशमूर्तीचे आणि १४९ गौरींचे विसर्जन संपन्न झाले.
दिघा विभागात १ नैसर्गिक व १० कृत्रिम विसर्जन स्थळांवर ६८२ घरगुती व ०३ सार्वजनिक आणि ८४ गौरींचे विसर्जन संपन्न झाले. दिघा विभागांतर्गत १४ गावांमध्ये ३३४ श्री गणेश मूर्तींचे व ३८ गौरींचे विसर्जन संपन्न झाले.
अशाप्रकारे संपूर्ण नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील १८९ विसर्जन स्थळांवर २२३० गौरींसह १४३१८ श्रीगणेशमूर्तींना भक्तीपूर्ण निरोप देण्यात आला.
गौरींसह होणारे श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन मोठया संख्येने होत असल्याने आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विसर्जन स्थळांवर महानगरपालिकेची विसर्जन यंत्रणा तसेच पोलीस दक्षतेने कार्यरत होते. मुख्य विसर्जन स्थळांवर मोठया आकाराच्या मूर्तींसाठी तराफ्यांची व्यवस्था करण्यात आली होती तसेच पुरेशी विद्युत व्यवस्था आणि जनरेटर व्यवस्था होती. त्याठिकाणी नागरी आरोग्य केंद्रामार्फत वैद्यकीय पथके तैनात होती व विसर्जन व्यवस्थित रितीने व्हावे याकरिता आवश्यक संख्येने स्वयंसेवक व लाईफगार्ड्स विभाग कार्यालयांच्या वतीने कार्यरत होते. यासोबत नमुंमपा अग्निशमन दलाचे जवानही सुरक्षेच्या दृष्टीने कार्यरत होते. कृत्रिम विसर्जन स्थळांवरही सुयोग्य व्यवस्था होती. महानगरपालिकेने गर्दीचे विभाजन व्हावे या अनुषंगाने केलेली विसर्जन व्यवस्था व १५६ इतक्या मोठया संख्येने निर्माण केलेले कृत्रिम तलाव याबद्दल अनेक नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
स्वच्छ शहर म्हणून असलेला नवी मुंबई महानगरपालिकेचा नावलौकिक जपण्यासाठी सर्व विसर्जन स्थळांवर ओल्या व सुक्या निर्माल्यासाठी स्वतंत्र कलश ठेवण्यात आलेले आहेत. येथील निर्माल्य सातत्याने निर्माल्य संकलन वाहनांव्दारे उचलून नेले जात असून तुर्भे येथील प्रकल्पस्थळी निर्माल्याचे पावित्र्य राखून स्वतंत्र संकलन करण्याची व योग्य विल्हेवाट लावण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी पर्यावरणपूरक प्लास्टिकमुक्त श्रीगणेशोत्सव साजरा करण्यास उत्तम प्रतिसाद दिला असून शाडूच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करणे तसेच कृत्रिम तलावात श्रीमूर्ती विसर्जन करणे अशा पर्यावरणपूरक वर्तनाचा अंगिकार केला आहे. अशाच प्रकारचे सहकार्य यापुढील विसर्जन काळातही राखावे व पर्यावरणशील दृष्टीकोन जपत आपल्या गणेशमूर्तींचे घराजवळच्या कृत्रिम तलावात विसर्जन करावे असे आवाहन महापौर श्रीम सुजाता पाटील व नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

