- नवी मुंबईतील रंगकर्मी–चित्रकर्मींनी अर्पण केली पद्मश्री नाना पाटेकरांना भावपूर्ण श्रद्धांजली
नवी मुंबई : ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर यांच्या निधनाने रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील एक अष्टपैलू कलाकार तसेच समाजाप्रती संवेदनशील असलेले व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त करत नवी मुंबईतील रंगकर्मी व चित्रकर्मींनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी नवी मुंबईतील विविध रंगकर्मी, चित्रकर्मी व कलाकार उपस्थित होते. कै. नाना पाटेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच, पुष्प अर्पण करत उपस्थित कलाकारांनी त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी नाना पाटेकर यांच्या प्रदीर्घ कलाप्रवासाचे आणि सामाजिक कार्याचे स्मरण करण्यात आले.
या श्रद्धांजली कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते चित्रकार व रांगोळीकार श्रीहरी पवळे यांनी साकारलेले नाना पाटेकर यांचे रांगोळीतील व्यक्तिचित्र. आपल्या कलेच्या माध्यमातून श्रीहरी पवळे यांनी नाना पाटेकर यांना अनोखी आदरांजली अर्पण केली. नवी मुंबईतील रसिक प्रेक्षक, रंगकर्मी, चित्रकर्मी आणि विष्णुदास भावे नाट्यगृह यांच्या वतीने या रांगोळीच्या माध्यमातून कैलासवासी पद्मश्री नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
नाना पाटेकर हे केवळ चतुरस्त्र अभिनेते होते. त्याचबरोबर शेतकरी, कष्टकरी तसेच समाजातील गोरगरीब आणि गरजू व्यक्तींविषयी भावनिक आपुलकी असलेले संवेदनशील व्यक्तिमत्त्व होते. आपल्या अभिनयातून त्यांनी अनेक भूमिका अजरामर केल्या, तर सामाजिक बांधिलकीतूनही त्यांनी समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला.
यावेळी काही कलाकारांनी नाना पाटेकर यांच्यासोबत केलेल्या कामाच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या अभिनयातील बारकावे, कामाप्रती असलेली निष्ठा, साधेपणा आणि सहकलाकारांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध याबाबतच्या आठवणी सांगताना अनेक कलाकार भावूक झाले.
श्रद्धांजली कार्यक्रमादरम्यान उपस्थित रंगकर्मी–चित्रकर्मींचे डोळे पाणावले होते. जड अंतःकरणाने नाना पाटेकरांना श्रद्धांजली अर्पण करताना “असा नटसम्राट होणे नाही,” अशी भावना अनेक कलाकारांनी व्यक्त केली.
विशेष म्हणजे, नवी मुंबईतील विष्णुदास भावे नाट्यगृहाशी नाना पाटेकर यांचे एक अतूट आणि भावनिक नाते होते. या नाट्यगृहाचे उद्घाटन ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या शुभहस्ते झाले होते, ही आठवणही यावेळी उपस्थित रंगकर्मी–चित्रकर्मींनी आवर्जून सांगितली. ज्या नाट्यगृहाच्या उद्घाटनप्रसंगी नाना पाटेकर यांच्या हस्ते कलेचा दीप प्रज्वलित झाला, त्याच विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या माध्यमातून आज त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याची वेळ येणे, हा क्षण प्रत्येक कलाकारासाठी अत्यंत भावूक करणारा ठरला. नाना पाटेकर यांच्या आठवणींनी भारावलेल्या वातावरणात अनेक कलाकारांच्या डोळ्यांत अश्रू तरळले आणि त्यांच्या कलाप्रवासाला मनःपूर्वक अभिवादन करण्यात आले.
नाना पाटेकर यांनी रंगभूमी, चित्रपटसृष्टी आणि समाजकारणाच्या माध्यमातून निर्माण केलेला आदर्श पुढील पिढीतील कलाकारांसाठी प्रेरणादायी राहील. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत येणाऱ्या काळात नवी मुंबईतील रंगकर्मी आणि चित्रकार्मींनी रंगभूमी, चित्रपटसृष्टी आणि समाजासाठी अधिक संवेदनशीलतेने व निष्ठेने कार्य करण्याचा संकल्प यावेळी उपस्थित कलाकारांनी व्यक्त केला.
नाना पाटेकर यांचे कलाक्षेत्रातील योगदान, त्यांची सामाजिक बांधिलकी आणि सामान्य माणसाशी असलेले नाते कायम स्मरणात राहील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
यावेळी, कै. विष्णुदास भावे नाट्यगृहाचे व्यवस्थापक गिरीश चावरे, श्रीहरी पवळे, रवींद्र पाटील, शशी तुपे, रवी मोरे, मुकुंद महाले, मदन मुकादम, जगदीश शेळके, रंगराव घागरे, देवा सरकटे, दत्ता करे, विलास चव्हाण, मिलिंद कांबळे, रोशन मोरे, मिलिंद बनसोडे, प्रशांत जोशी, सुनील पगार, यासह नवी मुंबईतील रंगकर्मी, चित्रकर्मी, अभिनेते, दिग्दर्शक व कलाक्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

